मुंबई : Maharashtra Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील दालनात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते. पूजा केल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर मोठा उत्साह दिसून आला. त्यांचे स्वागत करण्यासाठी समर्थक आमदार, पदाधिकारी, अधिकारी यांची गर्दी झाली होती.



 मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील दालनासमोर सुवासिनींनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर द्यावयास सांगितले आहे.



दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार केशव ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना यांनी वंदन केले. दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनास मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहायक आयुक्त प्रशांत सकपाळ, दालनाच्या व्यवस्थापक निलिमा कामत उपस्थित होत्या.