`केंद्र सरकारने आकसाने वागू नये, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत द्यावी`
महाविकासआघाडीत सहभागी होण्यापूर्वी शिवसेना भाजपप्रणित `एनडीए`तून बाहेर पडली होती.
मुंबई: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत पुरवली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते रविवारी विधिमंडळातील पत्रकार कक्षात बोलत होते. यावेळी उद्धव यांनी पत्रकारांशी अनेक मुद्द्यांवर अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत दिली पाहिजे. केंद्राने आकसाने वागू नये अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले पाहिजे. या नेत्यांनी केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी केली पाहिजे, असेही उद्धव यांनी सांगितले.
मेट्रो कारशेडसाठी आरेऐवजी 'ही' पर्यायी जागा; उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव
महाविकासआघाडीत सहभागी होण्यापूर्वी शिवसेना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली होती. आगामी राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजपमधील संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासंदर्भात मोदी सरकार वेळोवेळी काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
तत्पूर्वी आज उद्धव ठाकरे यांनी राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णयही जाहीर केला. यामध्ये बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात येईल. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामालाही स्थगिती दिली होती. मात्र, केवळ आकसापोटी कोणताही प्रकल्प रद्द करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.