मुंबई : १५ एप्रिलपर्यंत शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी करा असे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीसाठी ९५ टक्के शेतकऱ्यांची आधार जोडणी पूर्ण झालेली आहे. याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ही कर्जमाफी देण्यात येणार आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दररोज आढावा घेणार आहेत. अल्पावधीत या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची तयारी केली, त्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची तयारी करतांना येणाऱ्या लहान लहान तांत्रिक  समस्यांचेही निराकरण करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांची एकच झुंबड होईल, अशा वेळी योग्य ते नियोजन करावे व शेतकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधा व त्यांचे म्हणणे ऐका, अडचणी दूर करा, असा सल्ला अधिकाऱ्यांना देताना  कर्जमुक्ती म्हणजे आपण शेतकऱ्यांवर उपकार करीत नसून त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत अशा भूमिकेतून मदत करावी, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत.



महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या ३५ दिवसांत पूर्ण केले आहे. हा "जोश" असाच टिकवून ठेवा व १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ८८ टक्के पात्र शेतकऱ्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे.



आत्तापर्यंत ३२ लाख १६ हजार २७८ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी ९५ टक्के आधार जोडणी पूर्ण झाली आहे. २१ फेब्रुवारीपासून गावोगाव याद्यांची प्रसिद्धी आणि आधार प्रमाणीकरण सुरू होणार आहे. ११ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष यंत्रणा कशी काम करते याची पडताळणी सुरू होणार आहे. १५ एप्रिलपर्यंत शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी करा आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना दिसाला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.