मुंबई : राज्यात कोरोनाचे १२ रुग्ण आढळल्याची माहीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. याला काही तास उलटले नसतानाच आता या रुग्णसंख्येत दोनने वाढ झाली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. ठाण्यातील रुग्ण फ्रान्सवरून तर मुंबईतील रुग्ण दुबईहून आला होता, मुंबईतील रुग्णावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आता मुंबईत ३, पुणे ९, ठाणे १ आणि नागपूर १ रुग्ण आहेत. ठाण्यातील रुग्ण फ्रान्सवरून आला होता तर मुंबईत आढळलेला दुबईहून आला आहे. 


राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  यातील एक रुग्ण पुणे येथील असून या ३३ वर्षीय पुरुषाने अमेरिकेला प्रवास केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील ३५ वर्षीय तरुण तसेच हिंदूजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला ६४ वर्षाचा पुरुष रुग्ण आज प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आढळले. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.  



सर्व करोना बाधित रुग्णाच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत.
१२ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील  १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे.  बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. 


ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.  आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ६८५  प्रवासी आले आहेत. 


१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या  ५१ जण पुणे येथे तर २७ जण मुंबईत भरती आहेत. 


याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेड्स उपलब्ध आहेत. 


१२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते.  बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.