प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : सणांच्या धामधुमीत सामाजिक भान जपणारी ही बातमी... कोल्हापूर, सांगलीचा पूर पाहता मुंबईतल्या पवईमधल्या दहीहंडी मंडळानं एक चांगला निर्णय घेतलाय... खरंच सगळ्या दहीहंडी मंडळांनी आणि गणेश मंडळांनी आवर्जून विचार करावा, असा हा निर्णय आहे. नारळी पौर्णिमा येताच वेध लागतात दहीहंडीचे... पण यंदा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुरामुळे दहीहंडीचा जोरदार उत्साह नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक भान जपत पवईमधल्या 'शिव शंभो' सामाजिक प्रतिष्ठाननं दहीहंडी महोत्सव रद्द केलाय.


माणुसकीचा सण साजरा करुया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मंडळाचे कार्यकर्ते गेले तीन दिवस सांगली, कोल्हापूरमध्ये मदतकार्य करत आहेत. त्याचबरोबर दहीहंडी उत्सवासाठी मिळणारे लाखो रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती शिव शंभो सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक माटेकर यांनी दिलीय. 



यंदाचा गणेशोत्सवही साधेपणानं साजरा करुन पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहन, गणेशोत्सवर समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी केलंय. 


मुळात सामाजिक भान जपणं हाच सगळ्या सणांचा उद्देश... जे पवईच्या शिवशंभो दहीहंडी मंडळानं केलं, ते इतर दहीहंडी मंडळं आणि गणेश मंडळं करणार का? यंदा खरंच सण साधेपणानं साजरे करुया आणि पूरग्रस्तांना मदत करुन माणुसकीचा सण साजरा करुया...