दीपक भातुसे / अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्रात सत्तेच्या चाव्या हाती घेण्यासाठी राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आणि सहकारी पक्ष शिवसेना यांच्यातच जुंपलीय. सेना-भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणात पडद्यामागे महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. एकीकडे शिवसेना 'जे ठरलंय ते व्हायलाच हवं... सत्तेतला निम्मा वाटा शिवसेनेला' असं म्हणत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिवसेनेच्या या दाव्याची हवाच काढून टाकलीय. शिवसेनेला 'अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद' असा शब्द कधीच दिला नव्हता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पा करताना केलाय. सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालीच स्थापन होईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय. पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलंय. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचं काहीही ठरलेलं नसल्याचंही त्यांनी सांगिलंय.


पुढची पाच वर्षही मीच मुख्यमंत्रीपदावर कायम राहीन - मुख्यमंत्री


भाजप नेतृत्वात लवकरच राज्यात सत्ता स्थापन करणार आणि जनतेला स्थिर सरकार देणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर कायम राहीन यामध्ये मला कोणतीही शंका नाही... शपथविधीचा मुहूर्त अजून काढायचा आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार नाहीत तसंच शहा आणि उद्धव ठाकरेंची भेटही होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 


शिवसेनेला कधीही मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं नव्हतं. १९९५ चा फॉर्म्युला असेल वगैरे असंही काही ठरलेलं नव्हतं. लवकरच सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. यासाठी शिवसेनेशी औपचारिक आणि अनौपचारिकरित्या चर्चा सुरु आहे. कुणाला कोणती खाती द्यायची हेही काही अजून ठरलेलं नाही, चर्चेच्या वेळी यावर निर्णय घेऊ, असंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. यामुळे नेमकं शिवसेना आणि भाजपामध्ये काय ठरलं होतं? यावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडलाय.


भाजपाशी १० आमदारांनी संपर्क साधून पाठिंबा जाहीर केलाय. अजून १५ जणांचा पाठिंबा भाजपाला मिळेल, असाही विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक निकाल लागून अजून आठवडा पण झालेला नाही, २००४ ला सरकार स्थापन व्हायला एक महिना लागला होता, असं म्हणत भाजपाच सत्ता स्थापन करणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला.



विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालात महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष भाजपा १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर बहुजन विकास आघाडी- ३, एमआयएम- २, समाजवादी पार्टी- २, प्रहार जनशक्ती पार्टी- २, माकप- १, जनसुराज्य शक्ती- १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १, राष्ट्रीय समाज पक्ष- १, स्वाभिमानी पक्ष- १ आणि अपक्ष- १३ अशा इतर जागा निवडून आल्या आहेत.