`आता मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार`
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा उल्लेख लहान भाऊ असा केला होता.
मुंबई : सत्तास्थापन झाल्यावर आता मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा उल्लेख लहान भाऊ असा केला होता. त्या विधानाला अनुसरून उद्धव यांनी भाजपला हा टोला लगावला आहे. महाविकास आघाडीची बैठक नुकतीच मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. हा ठराव एकमताने मंजूर देखील झाला.
मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला काटे-खिळे असतात, जाणारा अजून एक-दोन खिळे ठोकून जातात. पण माझ्याकडे तुम्हा सर्वांच्या ताकदीचा हातोडा आहे. त्या हातोड्याने मी सर्व खिळे ठोकेन असे उद्धव यांनी म्हटले.
मी कोणाशी सुड बुद्धीने वागणार नाही पण कोणीही आडवे आले तर त्याला सरळ करायला आपण सगळे तयार आहोत असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर, ते अतिशय नम्र आणि भावनिक, पण फार संयमाने शब्द वापरून बोलत होते. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या भावना मांडल्या. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, देवेंद्रजी जेव्हा पत्रकार परिषदेत बोलले, असं काही ठरलंच नव्हतं, असा शब्द दिला गेलाच नव्हता, तेव्हा मला असंख्य इंगळ्या डसल्या सारखं झालं. ज्या मातोश्रीत ही चर्चा झाली, जिथे हे ठरलं, त्यानंतर तुम्ही याला खोटं ठरवता, हाच मातोश्रीचा मान सन्मान तुमच्या मनात होता का? असा सवाल आणि खोटं बोलणं आपल्याला किती टोचलं यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
मी आता तीन पक्ष एकत्र आले असताना आजही सांगतोय, खोटं मला कधीच चाललं नाही, माझ्या हिंदुत्वात खोटं कधीच खपवलं जाणार नाही, असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी जाहीर बैठकीत सांगितलं.
बाळासाहेब मला नेहमी म्हणायचे, उद्धव एखाद्याला शब्द दिला, तर 10 वेळा, 100 वेळा, 10 हजार, 1 लाख वेळेस विचार कर, पण दिलेला शब्द पाळ, प्राण गेला तरी चालेल पण शब्द पाळ, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.