मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची लगबग वाढली असून आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी गणेशभक्त उत्सुक आहेत. अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव (Ganpati Festival) आला आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमानुसार राज्यात सार्वजनिक गणपतीचं फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. (Maharashtra government issues new Guidlines for Ganeshotsav 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. भाविकांना मुखदर्शनही घेता येणार नाही. कोरोनासंकटामुळे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. तसंच बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी घातली गेली आहे. गणपती (Ganpati) आणण्यासाठी कोरोना लस घेतलेल्या 10 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे


गणेशोत्सवानिमित्ताने नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 


अशी असेल नियमावली


- बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी असून घरगुती गणेशमूर्तींची आगमन मिरवणूक काढू नये. दोन डोस घेतल्यांना सहभागी होता येईल. मात्र, 10 लोकांनाच परवानगी असेल.


- गणपतीची मूर्ती ही घरगुती उत्‍सवासाठी दोन फूटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी.


- सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असू नये आणि सर्वांनी कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावे. गर्दी टाळावी. गणपतीची मूर्ती ही सार्वजनिक उत्‍सवासाठी 4 फूटापेक्षा जास्‍त उंचीची नसावी.   


- घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. किंवा पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू/ संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे. 


- गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी 


- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन, मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे.  


- सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार, फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.