मुंबई : 'भाजपानं नकार दिला तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यायला हवं' असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १०५ जागा मिळवून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला ११ नोव्हेंबरपर्यंत सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलंय. आता, यावर आता अल्पमतात असलेला भाजपाकडे काय उत्तर देणार? किंवा कोणत्या दिशेनं हालचाली करणार? याकडे विरोधी पक्षांसहीत जनतेचंही लक्ष लागलंय. भाजपाच्या कोअर कमिटीची रविवारी बैठक आहे. या बैठकीत भाजपा सत्तास्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपाला सोमवारपर्यंत राज्यपालांना उत्तर द्यावं लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेकडे सध्या ५६ आमदार आणि जवळपास ७ अपक्षांनी पाठिंबा असा ६३ मतांचं पाठबळ आहे. भाजपा शिवसेनेसोबतच सहजच बहुमाताचा आकडा गाठू शकतं परंतु, राज्यातली सध्याची राजकीय स्थिती पाहता ते कठिणच दिसतंय. त्यामुळे, सत्तास्थापनेसाठी आता भाजपा शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  


राज्यपालांचं आमंत्रण भाजपानं स्वीकारलं तर...


आता, राज्यपालांचं सत्तास्थापनेचं आमंत्रण भाजपानं स्वीकारलं तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपधविधी होईल किंवा मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांचा शपथविधी पार पडू शकेल. जर शपथविधी झाला तर राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवतील ज्यामध्ये विश्वासदर्शक ठरवला भाजपला सामोरं जावं लागेल.


राज्यपालांचं आमंत्रण भाजपानं स्वीकारलं नाही तर...


जर भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला तर राज्यपाल हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला निमंत्रित करतील.



शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आम्ही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही' असा शब्द जनतेला दिलाय. त्यामुळे, यादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चर्चा होऊन काही 'ठरलं' तर मग 'महायुती'चं सरकार स्थापन होऊ शकेल.  


राज्यातलं पक्षीय बलाबल


भाजपा १०५


शिवसेना ५६


राष्ट्रवादी ५४


काँग्रेस ४४ 


बहुजन विकास आघाडी ३


एमआयएम २


समाजवादी पार्टी २


प्रहार जनशक्ती पार्टी २


माकप १ 


जनसुराज्य शक्ती १


क्रांतिकारी शेतकरी पार्टी १


महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ 


राष्ट्रीय समाज पक्ष १ 


स्वाभिमानी पक्ष १


अपक्ष १३