`शिवसेनेच्या ५६ पैंकी ४५ आमदार भाजपात येण्यासाठी इच्छूक`
`झी २४ तास`च्या रोखठोक कार्यक्रमात भाजपा खासदाराचा गौप्यस्फोट
मुंबई : शिवसेना आणि भाजपामधला सत्तासंघर्ष दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे तब्बल ४५ आमदार भाजपामध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते.
तर, आमच्याशिवाय भाजपा कसं सरकार स्थापन करणार? असा प्रश्न विचारत शिवसेनेनं ५०-५० टक्के मंत्रीपदं आणि मुख्यमंत्रीपदाचा घोषा कायम ठेवलाय. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरेंच्या रुपाने आमदार असून आता त्यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर भाजपानं मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहील, असं सांगितलंय.
विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालात महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष भाजपा १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर बहुजन विकास आघाडी- ३, एमआयएम- २, समाजवादी पार्टी- २, प्रहार जनशक्ती पार्टी- २, माकप- १, जनसुराज्य शक्ती- १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १, राष्ट्रीय समाज पक्ष- १, स्वाभिमानी पक्ष- १ आणि अपक्ष- १३ अशा इतर जागा निवडून आल्या आहेत.