कोस्टल गुजरात पॉवर कंपनीकडून वीज खरेदीस मान्यता - ऊर्जामंत्री नितीन राऊत
राज्यात भविष्यात उभे राहणारे उद्योग आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेवून राज्य सरकारने वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यात भविष्यात उभे राहणारे उद्योग आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेवून राज्य सरकारने वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विजेची कमतरता असल्याने राज्य सरकारने कोस्टल गुजरात पॉवर कंपनीकडून वीज खरेदी करणार आहे. या वीज खरेदीला राज्य मंत्रिमंडाळाने मान्यता दिली आहे.
कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड या गुजरात येथील औष्णिक वीज प्रकल्पातून पूरक वीज खरेदीसाठी करार करण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पातून निर्माण होणारी ७६० मेगावॅट वीज खरेदीसाठी २२ एप्रिल २००७रोजी महावितरण कंपनीने दीर्घ मुदतीचा करार केला आहे. त्याचा समतल दर दोन रुपये २६ पैसे प्रती युनिट इतका आहे.
कोस्टल गुजरात प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी विचारात घेऊन सर्व वीज खरेदीदार राज्यांची संयुक्तपणे एक समान दराने समान अटी व शर्तींसह पूरक वीज खरेदी करार करण्यास सहमती असल्यास केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून पूरक वीज खरेदी करार करण्यात येईल. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.