मुंबई: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. मात्र, सरकार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीत कोरोनाचा धडकी भरवणार वेग; एकाच दिवसात ३४ नवे रुग्ण

चंद्रकांत पेंदूरकर यांना २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून पेंदूरकर यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

आतापर्यंत राज्यातील ९६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १५ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.  दरम्यान, रविवारी राज्यात कोरोनाचे ४४० नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांपलीकडे गेला आहे. त्यामुळे आता ३ मे नंतरही राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.