मुंबई: शहरातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीत COVID-19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग वाढल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीतील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. मात्र, रविवारी धारावीत कोरोनाचे ३४ नवे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धारावीत पहिल्यांदाच एकदा दिवसात इतके रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या आता २७५ इतकी झाली आहे.
देशात गेल्या २४ तासांत १९७५ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २६ हजारांवर
धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्यास मुंबईत मोठी मनुष्यहानी होण्याचा धोका आहे. धारावीतील अनेक भाग सील करूनही या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
उर्वरित मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. , मुंबईतील २४ पैकी १७ वॉर्डमध्ये कोरोनाचे १०० पेक्षा अधिक रूग्ण आहेत. वरळीचा भाग येत असलेल्या जी दक्षिण विभागात आतापर्यंत सर्वाधिक ६०० रूग्ण तर ई विभागात ४६६ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५,४०७ इतका झाला आहे.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे ७० हजार रुग्ण?
मुंबईकरांसाठी मे महिना अधिक कसोटीचा असेल. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 70 हजारांवर पोहचण्याचा धक्कादायक अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या कोरोना टास्क फोर्सच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांनी फेसबुकवरून यासंदर्भात माहिती दिली.