मुंबई : करोना प्रादुर्भावावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अनेक राज्यांनी तर मोफत लसीकरण सुरू केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर दररोज लसीकरणाची ताजी आकडेवारी अपडेट केली जाते. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोना लसीचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण झाला असतानाच गेल्या काही दिवसात देशासह महाराष्ट्रात लसीकरणाचं प्रमाण घटल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलं आहे. लसीचा तुटवडा नसतानाही लसीकरणाचं प्रमाण कमी झालं आहे. अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला असला तरी दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ होत असल्याचं समोर आलं आहे. 


महाराष्ट्रात आतापर्यंत 12 कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. पण, दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. दुसरा डोस न घेणाऱ्यांवर काही बंधनं आणण्याचा विचार राज्य सरकार करतंय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी दिली आहे. 


धक्कादायक म्हणजे राज्यात दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या जवळपास दीड ते पावणे दोन कोटी इतकी आहे. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस उलटूनही दुसरा डोस न घेणाऱ्यांवर काही बंधनं येऊ शकतात. 


राज्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या समाधानकार आहे, पण दुसरा डोसच्या बाबतीत बरेच जिल्हे अद्याप मागे आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनबाबत असलेले समज, गैरसमज केंद्र सरकारने दूर करावेत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.