Maharashtra Gram panchayat Election 2022 : राज्यात आज 18 जिल्ह्यांतील 1 हजार 79 ग्रामपंचायतींचा निकाल लागला.  या निवडणुकीसाठी सुमारे 74 टक्के मतदान झालं होतं. विशेष म्हणजे यात सदस्यांसह थेट सरपंच पदासाठी देखील मतदान पार पडलं. पॅनल पद्धतीनं निवडणूक होत असल्यानं बऱ्याच ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत झाली. या निवडणूकीत शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट (Shinde Group vs Thackeray Group) असाही सामना होता. काही ठिकाणी भाजप-शिंदे गट विरूद्ध महाविकासआघाडी (BJP-Shinde Group vs Mahavikas Aghadi) असा सामना रंगला. तर काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार मैत्रीपूर्ण लढताना दिसले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीत समिश्र यश
या निवडणुकीत प्रमुख पक्षांना समिश्र यश पाहिला मिळालं. नागपूरात भाजप (BJP) आणि काँग्रेसला (Congress) समिश्र मिळालं, तर कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  (SSUBT) गटाने बाजी मारली. सिंधुदूर्गमध्ये चार पैकी तीन ठिकाणी भाजपने बाजी मारली. नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस 66 तर भाजपचं 54 ग्रामपंचायतींवर वर्चस्व पाहिला मिळालं. वाशिम आणि अमरावतीमध्ये अपक्षांचं वर्चस्व दिसून आलं. साताऱ्यात शिंदे गटाने मुसंडी मारली. पाटण तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीत गेल्या 60 वर्षांपासून राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. तिथे शिंदे गटाने बाजी मारली आहे. पालघर जिल्हयात भाजपने 89 ठिकाणी बाजी मारली. तर शिंदे गटाचं 56 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राहिलं.


'आम्हीच नंबर वन'
भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रितपणे बरीच पुढे आहे, असा दावा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आहे, गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आम्ही नंबर वन होतो, आणि यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आम्हीच नंबर वन आहोत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही अभिनंदन केलं. त्यांनी स्वत: या निवडणुकीत लक्ष घातलं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं.