Maharashtra Unlock | कोरोना नियंत्रणात, आणखी किती दिवस महाराष्ट्रावर निर्बंध असणार?
मुंबईसह राज्यभरातली कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आलीय. रूग्णसंख्येत घट झाल्यानं आता राज्याची संपूर्ण अनलॉकच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे.
मुंबई : शहरासह राज्यभरातली कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आलीय. रूग्णसंख्येत घट झाल्यानं आता राज्याची संपूर्ण अनलॉकच्या दिशेनं वाटचाल सुरू झालीय. कोरोना रूग्ण कमी होण्याचं प्रमाण असंच कायम राहिलं तर मार्च अखेरपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला एक चांगली बातमी मिळू शकते. (maharashtra may be unlocked by March 2022 due to declining corona patients)
कोरोना कधी संपणार असा सवाल गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक जण एकमेकांना विचारतोय. याचं उत्तर अद्याप संशोधकांना सापडलेलं नाही. मात्र मार्चनंतर महाराष्ट्र संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत मिळू लागलेत. गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट झालीय.
नवीन रूग्णांचं प्रमाणही कमी आहे. कोरोना नियंत्रणाची स्थिती अशीच कायम राहिली तर मार्च अखेरनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्स प्रमुखांनी दिलीय. मात्र हे करत असताना ब्रिटनमधल्या नव्या व्हेरियंटवरूनही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीय. निर्बंध हटवण्याबाबत केंद्रासोबत पत्रव्यवहार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हंटलंय.
संपूर्ण अनलॉकनंतर काय होणार?
सध्या थिएटर, मॉल, नाट्यगृहात 50 % उपस्थितीचं बंधन आहे. अनलॉकनंतर 100% लोकांना उपस्थित राहता येईल. हॉटेल्स रात्री 10 नंतरही सुरू ठेवण्यास परवानगी मिळेल. लग्न समारंभातील उपस्थितीचं बंधन संपेल. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी मिळेल.
विशेष म्हणजे मार्चअखेरपर्यंत कोरोनाची स्थिती काय असेल यावरच मास्कमुक्तीचा निर्णयही अवलंबून राहिल. गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. तसंच मास्क नसेल तर दंडात्मक कारवाईदेखील सुरू आहे. रूग्णसंख्येत घट होत राहिल्यास लोकांना मास्कपासून मोठा दिलासा मिळेल.
अर्थात कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनसोबत डेल्टाक्रॉननं डोकं वर काढलंय. आगामी काळात कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट येण्याची भीती आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे राज्य संपूर्ण अनलॉक होईपर्यंत प्रत्येकानं आपली आणि कुटुंबाची जबाबदारी घेणं आवश्यक आहे.