Maharashtra Politics : आधी माणगाव...नंतर राजापूर आणि आता रत्नागिरी...मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) दुरवस्थेवरून मनसेनं (MNS) आक्रमक पवित्रा घेतलाय. अभी नही तो कभी नही असं म्हणत कंत्राटदार आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक आंदोलन सुरू केलंय. बुधवारी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चंद्रावर जाऊन खड्डे पाहण्यापेक्षा महाराष्ट्रातच खड्डे (Patholes) पाहा असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना गांधीगिरीने आंदोलन करण्याची सूचनाही दिली. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खळ्ळखट्याक सुरू केलंय. सगळ्यात आधी मनसे कार्यकर्त्यांनी माणगाव इथलं चेतक सन्नी कंपनीचं कार्यालय फोडलं. या कार्यालयातील खुर्च्या आणि टेबलची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राजापूरमधला हातिवली टोलनाक्याला लक्ष्य केलं. इतकच नाही रत्नागिरीच्या पाली खानू इथे हायवेचं काम करणाऱ्या कंपनीचं ऑफिस फोडलं. ठेकेदाराचा जेसीबीही फोडण्यात आला. तिकडे रत्नागिरीतही हॅन इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. मनसे रत्नागिरी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. राजापूर, रत्नागिरी, माणगावमध्ये कार्यकर्त्यांनी संतापाला अशी वाट मोकळी करून दिलीय. 


त्यात त्यांनी म्हटलंय गेल्या 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलंय. केवळ कोकणच नव्हे तर राज्यातल्या बऱ्याच रस्त्यांची अवस्था अशीच आहे. त्यामुळे आता मतपेटीतूनच राग व्यक्त करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. एकीकडे राज्यात गतीमान सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री वारंवार करतायेत. मात्र दुसरीकडे खड्ड्यांमुळे जिकडे-तिकडे वाहतूक मंदावल्याचं वास्तव आहे. 


दीपालीला सय्यद यांचा टोला
मनसेच्या या आंदोलनावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय. 'मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम,उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पन! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा! , असं दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 



दीपाली सय्यद यांच्या टीकेवर आता मनसे काय प्रतीक्रिया देणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.