मुंबई : राज्यात आज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने निर्बंध आणखी कठोर केले आहेत. ज्यामुळे आता राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा झपाट्याने होणारा संसर्ग रोखण्यासाठी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली गेली होती. ज्यामध्ये राज्यात कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत हे नियम लागू असतील. 


राज्यात लॉकडाऊननंतर राज्यात मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकारने हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर आणण्यासाठी काम सुरु केलं होतं. सर्वकाही पूर्वपदावर येत असतानाच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनचे संकेत येऊ लागले आहेत. मिशन बिगीन अगेन ऐवजी आता राज्यात 'ब्रेक दी चेन'च्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार काम करत आहे.


एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.