महायुतीचं ठरलं! `या` तारखेला होणार जागावाटपाची अधिकृत घोषणा... भाजपाला सर्वाधिक जागा?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक 2024 ला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याचा दावा केला आहे.
Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीसमोर (Mahayuti) सर्वात मोठा प्रश्न आहे तो जागावाटपाचा. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्व पक्षांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान महायुतीची जागावाटपाबाबतची रणनिती ठरण्याचं समोर येत आहे. महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झाल्या आहेत. 20 ऑगस्टला जागावाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलंय. अंबाबाईचे दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे नेते जागावाटपाची घोषणा करतील, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीची जबाबदारी फडणवीसांवर
विधानसभा निवडणुकीची पक्षाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. विधानसभेच्या जागा निश्चितीचा अधिकार, मतदारसंघात फेरबदल करण्याचेही अधिकार देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आलेयत. तसंच पक्षांतर्गत उमेदवार आणि मतदारसंघ निश्चित करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीय. मात्र महायुतीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर मित्रपक्षांशी चर्चा करून घेतले जाणार आहेत.
भाजपाला सर्वाधिक 150 जागा?
भाजप प्रदेश कार्यालयात कोअर कमेटीची महत्वाची बैठक पार पडली. भाजपच्या या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिलीय. विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. तसंच सरकारी योजना 288 मतदारसंघात पोहोचवण्यासाठी भाजपने रणनीती ठरवलीय. दरम्यान, राज्यात भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं मत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याची माहिती मिळतेय. भाजपमध्ये जागावाटपात मोठा फेरबदल होण्याचीही शक्यता आहे. प्रभारी भूपेंद्र यादवांच्या नेतृत्वात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक जिंकण्याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली.
महायुतीची बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संभाजीनगरमध्ये महायुतीची समन्वय बैठक होणारेय. या बैठकीत जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते, भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणारेत. लोकसभा निवडणुकीत योग्य समन्वय नसल्याचा आरोप होता, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत असं काही होऊ नये म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीने राज्यभर बैठका घेण्याचे आदेश दिल्यामुळे त्या पद्धतीनं या बैठका सुरु आहेत. नाराजी सोडून कामाला लागण्याची तयारी सुरुय. उदय सामंत,अब्दुल सत्तार, अतुल सावेंसह सगळेच नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात
16 ऑगस्टला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणारेत. भाजपचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नेते अतुल भोसले यांच्या मतदारसंघात भव्य जनसंवाद मेळावा होणारेय. या भव्य कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह इतर महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणारेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 10 लोकसभा मतदारसंघापैकी फक्त 4 लोकसभा मतदारसंघात यश मिळालं होतं.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं विशेष लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे आहे