मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या १५ दिवसानंतरही राज्यात नवं सरकार आलेलं नाही. त्यातच आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतले संबंध आणखी ताणले गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला असला, तरी सध्या तेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात भाजप-शिवसेनेचा सत्तासंघर्ष कायम असताना काँग्रेसने मात्र वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे आमचं लक्ष असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. राज्यपालांच्या निर्णयानंतर आम्ही आमची भूमिका ठरवू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. तसंच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अजून कोणताही विचार झाला नाही. आमच्याकडे सत्ता स्थापन करायला आकडा नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.


काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे. काळजीवाहू सरकार असतानाही अशी मदत करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. तसंच आम्ही या मदतीला विरोध करणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच राज्यात पुढचं सरकार भाजपचं येणार नाही, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.


भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडलं आहे.