आज परीक्षेचा दिवस; राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, कोणाला कोणाची साथ मिळणार याकडे लक्ष
Maharashtra political Crisis : राज्यात वर्षभरापासून सुरु असणारी राजकारणातील बंडाळी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच भर पडली ती म्हणजे राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानं.
Maharashtra political Crisis : राज्याचं राजकारण ढवळून काढणा-या सध्याच्या घडामोडींबाबत आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच संदर्भातली मोठी बातमी...
Maharashtra political Crisis : महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या घटना गेल्या दिवसांपासून घडत असतानाच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानं अनेकांनाच हादरा बसला. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट बुधवारी (आज) मुंबईत आपापली ताकद आजमावणार आहेत. जिथं हे दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करताना दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक बोलावली आहे.
राज्यातले राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी सर्वांनाच या बैठकीला येण्याचं निमंत्रण आहे. या बैठकीत पक्षातील सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यात येईल. तसंच अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना परतण्यासाठी आजच्या तारखेचा अल्टिमेटम देण्यात आलाय. हा अल्टिमेटम न पाळल्यास कारवाईचा इशारा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता आज या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं याची उत्सुकता आहे.
हेसुद्धा वाचा : "मी पण जातोय असं दिलीप वळसे पाटील सांगून गेले, अन् शरद पवारांच्या डोळ्यात आले अश्रू"
अजित पवारांनी कंबर कसली...
दुसरीकडे अजित पवारांनीही आजच मोठं शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार केलाय. आज अजित पवार गटाच्या वतीनं वांद्रे इथे MET भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठीचे फोन गेले आहेत. आता अजित पवारांच्या मागे किती आमदारांचं बळ उभं राहतं आणि शरद पवारांच्या पाठिशी किती आमदार उपस्थित राहतात यावर राष्ट्रवादीची पुढील रणनीती ठरणार आहे. दरम्यान या शक्तिप्रदर्शनांआधी गाठीभेटींना आणि तयारीला उधाण आलंय. काल रात्री उशिरापर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांशी चर्चा केलीय.
कोणाकडे किती संख्याबळ?
इथे प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदार असल्याचं म्हटलं आहे. तर, तिथे जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार 9 बंडखोर वगळता 53 पैकी उर्वरित सर्वजण शरद पवार गटासोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं या परीक्षेच्या दिवशी कोणाच्या गटात नेमकं किती संख्याबळ आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दिल्लीपर्यंत पडसाद
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय देश पातळीवर विरोधकांच्या आघाडीत सामील होण्याबाबतही या बैठकीत विचारमंथन अपेक्षित आहे.