Maharashtra Politics : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. गेल्या आठवड्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची गुपचूप भेट घेतली. या भेटीत नेमकं काय ठरलं हे गुलदस्त्यात असलं तरी राज्याच्या राजकरणावर याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत.  शरद पवार आणि अजित पवार भेटींवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांनीही नाराजी व्यक्त केलीय. पवारांच्या या भेटींमुळे संभ्रमावस्था आहे. एकीकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असताना दुसरीकडे शरद पवारांच्या अजित पवारांशी गाठीभेटी होत असल्यानं महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) नाराजी आहे.  शरद पवार बरोबर आले नाहीत तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करतंय... त्यामुळे शरद पवार गटानं सोबत राहण्याबाबत वेगळी भूमिका घेतली तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. पवार काका पुतण्याच्या भेटींवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. या भेटी हा चिंतेचा विषय आहे. लपून होणा-या भेटी योग्य नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांची प्रतिक्रिया
दुसरीकडे शरद पवार यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडलं आहे. तण्याने काकांना भेटण्यात गैर काय असा सवाल अजित पवारांनी केलाय. मी लपून फिरणारा माणूस नाही असंही ते म्हणाले.  पुण्याच्या बैठकीचं काही मनावर घेऊ नका. पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत या बैठकीला राजकीय रंग देऊ नका असं अजित पवार यांनी म्हटलंय. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे, चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होतं,  जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवार साहेब यांच्यासोबत होते. दोन पिढ्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जाणे काय चुकीचं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 


इथून पुढे कधीही आम्ही भेटलो तर ती कौटुंबिक भेट असेल, दिवाळीला भेटेन, दसऱ्याला भेटेन ती भेट कौटुंबिक असेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


शरद पवारांशिवाय तयारी करा?
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना बैठकीसाठी शरद पवार यांच्याशिवाय तयारी करावी लागेल असाटोला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांचे निर्णय संजय राऊत घेतात. यामुळे संजय राऊत यांना सोडूनच नाना पटोले उद्धव ठाकरे यांना भेटले असावेत. संजय राऊत हे शरद पवारांना सोडून हा निर्णय होऊ देणार नाहीत, टोलाही देसाई यांनी लगावलाय.


दरम्यान, दोन उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर लक्ष असल्याचे विधान नाना पटोले यांनी केलं होतं याला मंत्री शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिलय आमची काळजी नाना पटोले यांनी करण्याची गरज नाही. आमचा संसार सुखाचा चालू आहे. याविषयी अजित पवारांनी सांगितले आहे आम्ही वेडे नाही ती खुर्ची भरलेली आहे. कोणाचाही कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. नाना पटोले यांनी फक्त वाट बघावी यातील कोणत्याही खुर्चीकडे बघायची संधी देखील त्यांना मिळणार नाही असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी नाना पटोले यांना लगावला आहे