Shinde vs Thackeray : मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका मुलाखतीत केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.  एकनाथ शिंदे यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. गोडाऊनवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय. सोबत येताय की आत टाकू असंही त्यांना धमकावण्यात आलं. तेव्हा ते रडत होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मावळमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंना भाजपकडून (BJP) जॉईन ओर जेलची धमकी देण्यात आली होती, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री असून पैशांचं गोडाऊन सापडल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर येऊन रडायला लागले, असा गौप्यस्फोटही आदित्य ठाकरे यांनी केलाय. भाजपची पॉलिसी खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे, तर मिंदेची पॉलिसी खोटं बोल पण रडून बोल अशी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


आदित्य यांचा भाजपवर हल्लाबोल
भाजप देशात अब की बार चारशे पारचा नारा देत आहेत. पण अब की बार तडीपार अशी त्यांची अवस्था होणार आहे असं सांगत आदित्य ठाकरे यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. देशात भाजपच सरसरा येणार नाही हे त्यांना माहित आहे म्हणून जॉईन ऑर जेल या तत्वानुसार दबाव आणला जात आहे. पण अरविंद केजरीवाल भाजपमध्ये गेले नाही, जेलमध्ये जाईन पण भाजपात जाणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


युवासेना आक्रमक
दरम्यान, आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंची युवासेना ठाण्यात आक्रमक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आदित्य ठाकरेंनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ युवासेनेनं आंदोलन केलं. आदित्य मुख्यमंत्री शिंदेंवर बोचरी टीका केली होती. त्याविरोधात ठाण्यातील टेंभी नाका इथल्या आनंद आश्रम इथं युवा सेनेनं आंदोलन केलं.


संजय राऊत यांचाही निशाणा
मुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांवर उत्तर देताना संजय राऊत यांनी  गंभीर आरोप केलेयत. फडणवीस हे फोन टॅपिंग प्रकरणातील अपराधी होते. त्यामुळेच त्यांच्या मनात अटकेची भीती होती. अटक टाळण्यासाठी केंद्रातल्या सरकारने आणि फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणून आमदार फोडले असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय. केंद्रातलं सरकार शिंदेंना का अटक करणार होते ते त्यांना विचारा म्हणत, आमदार फोडण्यासाठी शिंदेंवर दबाव टाकण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलंय.मात्र, आमचं सरकार आल्यावर कारवाई करू असा इशारा राऊतांनी दिलाय.


संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी राऊतांची परिस्थिती आहे. राऊत फोन टॅपिंगचे आरोप करतात त्या प्रकरणात कोर्टाने क्लीनचीट दिलीय. मात्र, राऊत आणि ठाकरेंची अवस्था ही टाय टाय फिश अशी आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय...