अजित पवार गटाकडून शिंदे गटाची थेट अमित शाहांकडे तक्रार, निधी कमी देत असल्याचा आरोप
Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सर्वच आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. अजित पवार गटाने थेट दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केलीय. यामुळे दोन्ही गटात धुसफूस वाढलीय.
Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमधल्या अजित पवार गट आणि शिंदे गटात (Ajit Pawar Group vs Shinde Group) धुसफूस सुरु आहे. अजित पवार गटाने विकास निधी वाटपावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात दिल्लीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दोन दिवसांपूर्वी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाहा यांची भेट घेतली होती. यावेळी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. विकासनिधी वाटपात तीन पक्षाचे आमदार यांना समानता हवीय. मात्र, तसं होताना दिसत नाही, शिंदे गटाचे मंत्री विकास निधी वाटप (Allocation of funds) करताना अजित पवार गटाच्या आमदारांना कमी देतात अशी तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
निधीवाटपावरुन आरोप-प्रत्यारोप
अजित पवार नेहमीच नाराज असतात. तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे मग तक्रारी कसल्या करता? धमक दाखवा. निधीवाटप नाराजीवरून विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अर्थमंत्र्यांच्याच मंत्र्यांना निधी मिळत नसेल तर खरा अर्थमंत्री कोण असा प्रश्न निर्माण होतो अशी टीका रोहित पवारांनी केलीये. तर महाराष्ट्रात चेहरा वाचणारा नवीन ज्योतीषी आल्याचं म्हणत नितेश राणेंनी रोहित पवारांना टोला लगावलाय.
शिंदे गटात अंतर्गत वाद
दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेच्या शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आलेत. माजी मंत्री रामदास कदमांनी खासदार गजानन कीर्तीकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका असा खोचक टोला लगावलाय. त्यावर कीर्तीकरांनीही गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद असल्याचं प्रत्युत्तर दिलंय. नुकतंच रामदास कदमांकडून त्यांचा मुलगा सिद्धेश कदमांसाठी मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. त्यावरून शिंदे गटातल्या या ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाद सुरू झालाय.
मविआतलं जागावाटप, नेत्यांची डोकेदुखी
दुसरीकडे, जागावाटपावरुन महाविकास आघाडीतही वाद आहेत. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. तेव्हा समसमान 16-16-16 जागांचं वाटप करणार? की मोठा भाऊ-छोटा भाऊ म्हणत प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार? 2019 मध्ये बुहतांश जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळाला होता. त्या जागांचा तोडगा कसा काढणार? जागा वाटपाच्या निर्णयाला काँग्रेस हायकमांडची मंजुरी मिळणार का? की राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिक जागांची मागणी होणार? लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातल्या इच्छूक उमेदवारांची धाकधूक वाढलीय.. मात्र जागावाटपातले हे मुद्देच मविआच्या ज्येष्ठ नेत्यांची नक्कीच डोकेदुखी ठरवणारे आहेत.