राज्यातील घडामोडींना वेग! राज्यपाल उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवण्याची शक्यता
महाविकास आघाडीला बहुमत चाचणी द्यावी लागणार?
Maharashtra Political Crisis : राज्यात गेले आठ दिवस सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला आता वेग आला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना बहुमत चाचणीचं पत्र दिलं.
सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा प्रकारची विनंती करणारं पत्र राज्यपालांना भाजपने दिलं आहे. राज्यपाल योग्य निर्णय घेतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य ते निर्देश देतील अशी आम्हाला अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर आता महाविकास आघाडीतही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीने उद्या तात्काळ बैठक बोलावली आहे. कोर्टात जायचं, पुढे काय करायचं याबाबतची खलबतं या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या राज्यपाल बोलावण्याची शक्यता आहे, बहुमत सिद्ध करण्याबाबत राज्यपाल मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.