एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
गेल्या अडीच वर्षात 12 हजार कोटी हे नगरविकास खात्यात दिले गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचा आरोप चुकीचा आहे. रडीचा डाव खेळायचा असेल तर कुणाला तरी दोष द्यायचा म्हणून राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक दोष देण्याचं काम करण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा एक अद्भूत प्रयोग आमचे नेते शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष पवारांनी एकत्रित केले. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून अनेक चांगल्या योजना आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
राज्याच्या राजकारणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधत पायउतार होण्याचा निर्णय घेतला. एक सरळ, चांगला आणि लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला होता. मुख्यमंत्री म्हणून शेवटचं भाषण करताना सर्वांचेच आभार मानले. भविष्यात पुन्हा एकत्रित येऊन काम करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं सरकार टिकलं पाहिजे हा प्रयत्न केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संख्या कमी होती, भाजपच्या विरोधात शिवसेनेनंही आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आणि हे सरकार चांगलं चाललं.
दुर्देवाने शिवसेनेतील काही आमदार त्यांच्यापासून दुरावले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले. त्यांचं पाठबळ नाही हे पाहता उद्धव ठाकरे यांनी स्वत: पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
कोरोनासारखं संकट आलं असताना मुख्यमंत्री आणि प्रशासन किती उत्तम काम करु शकतात याचं उदाहरण देशासमोर ठेवलं.
आज मुख्यमंत्री पायउतार झाले असले तरी महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून ते दिर्घकाळ लक्षात राहितील असं जंयत पाटील यांनी म्हटलंय.