नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .
Maharashtra CM : सध्या राज्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती केवळ एका पदाची आणि ते आहे मुख्यमंत्रिपद (Chief Minister). प्रतिष्ठा, दरारा, थाटमाट पाहून आमदार बनलेल्या प्रत्येकालाच मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असतेच.. काहीजण जाहीर कार्यक्रमातून तर काही जण ऑफ द रेकॉर्ड मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवतात. तर प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यालाही आपल्या साहेबाने मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असतं. काहीच दिवसांपूर्वी अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला गेल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बदलाची चर्चा झाली. याच साऱ्या राजकीय घडामोडींमुळे राज्यात भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चांना उधाण आलंय. ( Many leaders of state want to become Chief Minister)
कोण कोण भावी मुख्यमंत्री?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार (Ajit Pawar) यांना भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारी होर्डिंग्स पुणे आणि त्यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तेर गावात लागली. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावानं भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर्स नुकतीच नागपुरात लागली होती. वरळी मतदारसंघातून जिंकून आल्यानंतर आदित्य ठाकरेंचाही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारी पोस्टर्स झळकली. लोकांच्या मनातील मुख्यमंत्री शब्दप्रयोग पंकजा मुंडेंबद्दल (Pankaja Munde) झाला आणि तिथून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं बिरुद त्यांच्यामागे लावलं गेलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं मनसैनिकांना वाटतं, त्यांचा हिंदुजननायक, भावी मुख्यमंत्री अशी होर्डिंग्स लागतात. खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना भावी मुख्यमंत्री म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनाही भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लागले. मध्यंतरीच्या काळात काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनीही (Ravindra Dhangekar) मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.
'मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अशा चर्चा करायच्या नसतात', असं बोलकं विधान काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलं होतं. गेल्या 4 वर्षात राज्याने देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे 3 मुख्यमंत्री पाहिलेत. नाट्यमय घडामोडी घडून हे सारे जण मुख्यमंत्री बनले. त्यामुळेच महाराष्ट्रात कधीही काहीही घडू शकतं आणि आपला नेताही मुख्यमंत्री बनू शकतो असं कार्यकर्त्यांना वाटणं साहजिक आहे. मात्र त्यामुळे राज्यात खूप सारे भावी तयार झालेत.