आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणी निकाल ठाकरे गटाच्या (Thackeray Group) बाजूनं लागणार की शिंदे गटाच्या (Shinde Group) याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झालीय.बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला निकाल देणार आहे, अशी माहिती स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. तसंच राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकालही 30 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न आहे, असंही नार्वेकर म्हणालेत. याबाबत तीन शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
शक्यता क्रमांक 1
निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं लागला तर शिवसेना शिंदे गटातील 40 पैकी 16 आमदार अपात्र ठरतील
शक्यता क्रमांक 2
निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर शिवसेना ठाकरे गटातील 14 आमदार अपात्र ठरतील
शक्यता क्रमांक 3
कोणत्याही गटाचा आमदार अपात्र ठरणार नाही, विधानसभा अध्यक्ष प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवतील
शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्यांच्यासमोर काय पर्याय उपलब्ध असतील..
शिंदे गटासमोर पर्याय काय?
1 - मुख्यमंत्री शिंदेंसह 3 मंत्रीही 16 आमदारांमध्ये असल्यानं त्यांच्या आमदारकीसह मंत्रीपदही जाऊ शकतं
2 - मुख्यमंत्री शिंदेंचं मुख्यमंत्रीपद कायम राहिल, त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलं जाऊ शकतं, या पर्यायाची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आधीच वाच्यता करण्यात आली होती
3 - विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो
ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्यांच्यासमोर पर्याय काय असेल पाहुयात..
ठाकरे गटासमोर पर्याय काय?
1 - ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागू शकतात
2 - ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे, त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो
निकालात जर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार अपात्रच ठरले नाहीत तर शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण 34 याचिकांचा 6 गटात समावेश करुन सुनावणी पार पडली. त्यामुळे निकालाचा केवळ सारांश वाचला जाईल. कोणत्याच गटाचा आमदार अपात्र ठरणार नाही असाच निकाल येण्याची शक्यता सर्वाधिक मानली जातेय. कारण शिंदे गटात मुख्यमंत्री शिंदेंसह 3 मंत्री आहेत. शिंदे गट अपात्र ठरला तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो तर ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवतील असाच अंदाज बांधला जातोय..
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षावर जाऊन घेतलेल्या भेटीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जोरदार टीका केलीय. या भेटीमुळे शंकेला वाव आहे असा आरोप पवारांनी केलाय. तर न्यायाधीशच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार असा सवाल ठाकरेंनी केलाय. तर मतदारसंघातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली असं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलंय. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक पूर्वनियोजित होती, जनतेच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काय? असा सवालही राहुल नार्वेकरांनी केलाय.