ठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता दसऱ्याला शरद पवारांची तोफही धडाडणार, `या` ठिकाणी सभा
दसऱ्याचा दिवस हा मेळावे राजकीय आरोप -प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. यादिवशी आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार देखील सभा घेणार आहे.
Sharad Pawar Melava : शरद पवार यांचा उल्लेख करताना एक मुरब्बी नेता म्हणून आवर्जून त्यांची ओळख करून दिली जाते. हाच नेता वयाच्या 83 व्या वर्षी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसतोय. अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी बंड केल्याने नव्यानं उभं राहण्याची वेळ शरद पवारांवर आली आहे. न खचता अत्यंत मिश्किलपणे खिलाडूवृत्तीनं पवार या आव्हानाला सामोरं जातायत. राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झाल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली.
शरद पवारांचा दसरा मेळावा
ठाकरे, शिंदे आणि मुंडे यांच्यानंतर आता शरद पवार यांचाही दसरा मेळावा (Dussehra Melava) होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात शरद पवरांच्या सभेने होणार आहेत. तर यात्रेची सांगता नागपूरात शरद पवारांच्या सभेने होईल. दसऱ्याच्या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेची अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे.दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते.यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात.पण शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिवसेनेत दसरा मेळाव्यावरुनही चांगलंच राजकारण तापलं होतं. पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून दोन वेगळे मेळावे घेण्यते येतात. याचदिवशी बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील मेळावा घेतात. आता यात भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे
शिंदे गटाची धावपळ
दरम्यान, दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी शिंदे गटाची चांगलीच धावपळ सुरू आहे. शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसह पाच मैदानांसाठी अर्ज केले आहेत. शिवाजी पार्कसह क्रॉस मैदान, bkc, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सोमय्या मैदानासाठी या ठिकाणी परवानगी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज यावर चर्चा होऊन नक्की कोणत्या ठिकाणी दसरा मेळावा घेयायचा ते ठरणार आहे. सोमय्या किंवा रेसकोर्स मैदानावर मेळावा होण्याची जास्त शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.