Maharashtra Politics : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिवसेना (Shivsena) ठाकरे गट  आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) युतीची घोषणा आज अखेर झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी दुपारी आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेत नव्या युतीची घोषणा केली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको, असं म्हटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस फारसी उत्सुक नसल्याची चर्चा सातत्याने होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही रविवारी एका कार्यक्रमात बोलताना, मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असं उत्तर दिलं होतं. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिलीय.



"निवडणुकीमध्ये एक बदलाच राजकारण सुरु झालं. गेली अनेवर्ष उपेक्षीतांच राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून सर्व प्रयत्न करण्यासाठी आम्ही चळवळ सुरु केली. जिंकून येणं हे मतदाराच्या हातामध्ये आहे. पण उमेदवारी देणं हे पक्षाच्या हातामध्ये आहे. राज्यात मुद्याच राजकारण बाजूला पडलयं. शरद पवारांची मी आज प्रतिक्रिया वाचली. शरद पवारांशी आपलं जुनं भांडण सर्वांना माहिती आहे. हे शेतातलं भांडण नाही. हे भांडण दिशेचं, नेतृत्वाचं आहे. शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो," असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 


दावोसला फक्त करारनामे होतात


"उपेक्षितांचे राजकारण व्हावे यासाठी प्रयत्न केले. जिंकून येणं हे मतदारांच्या हातात आहे. उमेदवारी देणे पक्षाच्या हातात आहे, त्याचे सार्वत्रिकीकरण होईल," असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच राजकारणात नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे. दावोसला फक्त करारनामे होतात, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.


नरेंद्र मोदींच्या भाजपाचाही अंत होणार 


"ईडीच्या मार्फत राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाजपाचाही अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील नेतृत्व संपवलं आहे अशी टीका केली. राष्ट्र हे सर्वात महत्वाचं असून राजकारण नितीमत्तेवर येईल याचा प्रयत्न राहील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.