Sharad Pawar Politics : शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर शरद पवारांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना शिंगावर घेतलं. मात्र अजित पवार आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आधी केलं. शरद पवारांनीही (Sharad Pawar) त्याचीच री ओढली.. त्यामुळं महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते पुन्हा बुचकळ्यात पडलेत. पवारांच्या नव्या गुगलीमुळं ते तळ्यात आहेत की मळ्यात हेच कळेनासं झालंय. एकीकडं इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या बैठकांना ते हजेरी लावतायत. 31 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडं लवकरच ते एनडीएत (NDA) सामील होतील, अशी आशा भाजपला वाटतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारांच्या वक्तव्याचे पडसाद
शरद पवारांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले गेले. पवारांनी पुन्हा दोन दगडांवर पाय ठेवल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. ज्यानं त्यानं आपापल्या परीनं पवारांच्या विधानाचे अर्थ लावले. मित्र पक्षांच्या नेत्यांना वाटतंय की हा पवारांच्या रणनीतीचा भाग आहे. तर हा मोठा गेम आहे असं पवारांच्या विरोधकांना वाटतंय. दुसरीकडे अजित पवार गटातल्या मंत्र्यांना तर थेट आपल्या दैवतानंच आशीर्वाद दिल्याचा आनंद झाला. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी मात्र सावध भूमिका घेत पवारांच्या भूमिकेत विरोधाभास असल्याचं सांगत पवारांवर टीकास्त्र सोडलं. 


तीन तासात घुमजाव
मात्र केवळ तीन तासांतच पवारांनी साता-यात पुन्हा दुसरी गुगली टाकत आपल्या होमग्राऊंड बारामतीत केलेल्या विधानावरून घुमजाव केलं. आपण असं बोललोच नसल्याचा दावा पवारांनी केला. अजित पवार आमचे नेते आहेत ही असं मी बोललो नाही, ही माध्यमांची चूक असल्याचं आता शरद पवार यांनी म्हटलं आहे. संधी सारखी मागायची नसते, संधी सारखी द्यायची नसते असं स्पष्ट करत शरद पवारांनी अजित पवारांना आता संधी नाही हे जाहीर केलंय. 


मुंबईतल्या इंडिया बैठकीआधी शरद पवारांनी अजित पवारांबाबत परस्परविरोधी विधानं करून राजकीय राळ उडवून दिलीय. यात मविआसह महायुतीचे नेतेही गलिगात्र झाले आहेत. रोज माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया देणाऱ्या संजय राऊतांनीही पवारांच्या वक्तव्यानंतर मौन बाळगण पसंत केलं होतं. अखेर पवारांनी घुमजाव केल्यानंतर राऊतांचा जीव भांड्यात पडला. मात्र या निमत्तानं कात्रजचा घाट दाखवण्याची पवारांची राजकारणातली शैली यानिमित्तानं पुन्हा दिसून आली.. 


भाजपसोबत जाणार नाही, अशी राजकीय भूमिका शरद पवारांनी अनेकवेळा स्पष्टपणे मांडली. मात्र अजितदादांचा विषय आला की, पवारांची भाषा काहीशी नरमते. राजकारणापेक्षा रक्ताची नाती जास्त घट्ट आहेत का, याचा उलगडा लवकरच महाराष्ट्राला होईल, अशी अपेक्षा आहे.