Ajit Pawar vs Sharad Pawar :  महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह (NCP Party and Symbol) अजित पवार गटाचंच (Ajit Pawar) असल्याचा निर्णय दिलाय. शरद पवार (Sharad Pawar) गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हासाठी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे (Election Commission) धाव घेतली होती. सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं निर्णय दिलाय. त्यामुळे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला मिळालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेत जयंत पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातातुन पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. 


शरद पवार यांच्यासमोरचे पर्याय
निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिल्याने शरद पार यांच्याकडे आता दोन पर्याय आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालात धाव घेऊ शकतात. दुसरा पर्याय म्हणजे शरद पवार गटाला नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. नव्या पक्ष नोंदणीसाठी शरद पवारांना उद्याची मुदत देण्यात आली आहे. यासाठी उद्या संध्याकाळी 4 पर्यंत अर्ज करा असं निवडणूक आयोगने म्हटलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने हे आदेश दिलेत. अन्यथा शरद पवार गटाची अपक्ष अशी नोंद करु असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. 


शरद पवार गटाला 'हे' चिन्ह
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता शरद पवार गटाला उगवता सूर्य चिन्ह मिळण्याची शक्यता आहे. 


शरद पवार गटाची टीका
निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे . या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. तर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिलीय.