Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे (NCP) दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच अजित पवार यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. दादांच्या याच वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदेशाध्यक्षपदावरून (Regional President) घमासान सुरू झालंय. पक्षाच्या मेळाव्यात अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद नको, संघटनेत जबाबदारी द्या अशी उघड इच्छा शरद पवारांसमोरच बोलून दाखवली. अजित पवारांनी थेट प्रदेशाध्यक्षपदावरच दाखा ठोकल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यात छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) ओबीसी प्रदेशाध्यक्ष हवा अशी गुगली टाकलीय. विशेष म्हणजे स्वत:ही इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळांचं ओबीसी कार्ड
अजित पवारांच्या मागणीवर नुकत्याच राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष झालेल्या सुप्रिया सुळेंनीही (Supirya Sule) आनंद व्यक्त करत त्यांच्या इच्छापूर्तीला शुभेच्छा दिल्या आहेत.  अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी मात्र संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी दिलीय. दुसरीकडे अजित पवारांनी संघटनेच्या जबाबदारीबाबत बोलून दाखवताच जयंत पाटलांची (Jayant Patil) विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याच्या चर्चेलाही ऊत आला. मात्र आता भुजबळांनी ओबीसी कार्ड बाहेर काढल्यामुळे दोन्हीपैकी एका पदासाठी भुजबळांसह सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांसारख्या नेत्यांच्या नावांची चर्चा रंगू लागलीय.


भाकरी फिरवावयाची झाली तर फिरलीच पाहिजे
अनेक ठिकाणी संघटनात्मक बदल झाले पाहिजेत. भाकरी फिरवावयाची झाली तर फिरलीच पाहिजे. नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही तर जिथे घोषणा दिल्या जातात तिथे आपले उमेदवार निवडणून आले पाहिजेत.  शरद पवार यांच्या विषयी नको ती चुकीची टीका होता कामा नये. आम्ही खपवून घेणार नाही अशा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे. 


जयंत पाटील 5 वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. त्यामुळे भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. हे जाणूनच अजित पवारांनी सर्वात आधी रिंगणात आपली टोपी टाकली. मात्र भुजबळांनी ओबीसीची गुगली टाकल्यामुळे आता ही भाकरी फिरवण्याची कसरत दिसते तेवढी सोपी राहिलेली नाही. अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष केल्यास ओबीसी नेत्याला विरोधी पक्षनेतेपद द्यावं लागणार. मात्र राष्ट्रवादीत ही भाकरी फिरवताना कुणाची विकेट जाणार आणि कुणाला लॉटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.