Maharashtra Politcs : शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) औरंगजेबाने (Aurangzeb) फोडली म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी भाजपवर निशाणा साधला होता. औरंग्याची औलाद महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यावर आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांना मस्टरमंत्री म्हणण्यापूर्वी तुमची स्वतःची परिस्थिती दयनीय झाली आहे ती बघा अशी टीका भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात मुंबईच्या रंगशारदा सभागृहात संयुक्त बैठक पार पडली. राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना भाजपवर जोरदार टीका केली होती. औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपला लक्ष्य केले होते. त्यावर आता आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.


तुमचा जीव किती तुम्ही बोलता किती? - प्रसाद लाड


"उद्धवजी देवेंद्र फडणवीसांना मस्टरमंत्री म्हणण्यापूर्वी तुमची स्वतःची परिस्थिती दयनीय झाली आहे ती बघा. एक एक मंत्री, आमदार सोडून जात आहेत. तुमचा जीव किती तुम्ही बोलता किती?  देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मास्टर मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व देश ओळखतो. त्यामुळे तुम्ही तुमची लायकी ठेवून बोलावं ही माझी विनंती आहे. ज्या औरंग्याबद्दल तुम्ही बोलता तो खरा औरंग्या तुम्हीच आहात. ज्या शिवसेना प्रमुखांना काँग्रेसच्या विरोधात बंड केला त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी लालची होऊन तिथे जाऊन बसलात. यापेक्षा घृणास्पद गोष्ट काय असू शकते. तुम्ही खऱ्या अर्थाने औरंग्या आहेत. आज तुमची परिस्थिती नाट्यगृहात सभा घेण्याची झाली आहे," असे प्रसाद लाड म्हणाले.


तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? - आशिष शेलार


भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली. आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे, असे आशिष शेलार म्हणाले. "अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती! म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे…त्यांना सगळा हिशेब देऊच! तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!!," असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.