Maharashtra Politics : शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाने (Shinde Group) शिवसेनेच्या विधानभवनातील (Assembly) कार्यालयावर ताबा मिळवला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर शिवसेनेचे विधानसभा पक्ष कार्यालय शिंदे गटाला मिळाले आहे.  विधान परिषदेच्या बैठकीनंतर शिवालय हे पक्षाचे अधिकृत कार्यालय असल्याने ते शिंदे गटाच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता शिंदे गटाने विधानसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांचा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"माझं नाव आणि पक्षाचे चिन्हही चोरलेले आहे. चोराला राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरु झालाय. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरलेलं आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव चोरु शकत नाही. बाळासाहेबांच्या आणि मासाहेबांच्या पोटी जन्माला येण्याचे भाग्य त्यांना दिल्लीवाले देऊ शकत नाही. आज त्यांनी जी परिस्थिती शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय ती देशातल्या कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच याचा मुकालबला केला नाही तर 2024 ची लोकसभेची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक ठरू शकेल. कारण त्याच्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होऊ शकतो," असे उद्धव ठाकरे म्हणाले.


"16 जणांच्या अपात्रेबाबत उद्यापासून सुनावणी होणार आहे. मी मध्ये सांगितले होते की, तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय तो अयोग्य असून त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. दोन तृतीयांश आमदार एका संख्येने गेलेले नाहीत. त्यामुळे घटनेनुसार दोन तृतीयांश आमदारांना कुठल्याही पक्षात विसर्जित करावे लागतेच. ते विसर्जित झालेले नाहीत. त्यामुळे ते घटनेनुसार अपात्र ठरवले गेले पाहिजेत. त्याआधीच निवडणूक आयोगाने घाई करण्याची काय गरज होती," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


किती जण त्यांना वडिलांसारखे वाटतात माहिती नाही - उद्धव ठाकरे


"गुंतागंत वाढायला हवी म्हणून घाईघाईने निवडणूक आयोगाने निर्णय दिला अशी शंका मला वाटायला लागली आहे. एखाद्या पक्षामध्ये वाद झाल्यानंतर नाव आणि चिन्ह गोठवलं जातं. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आमचे नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. पण आम्ही निवडणूक जिंकली. काल कोणीतरी म्हणाले की अमित शाह त्यांना वडिलांसारखे आहेत. किती जण त्यांना वडिलांसारखे वाटतात माहिती नाही. माझे वडील तर ते चोरतच आहेत," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.


"पावसामध्ये पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे निवडणूक आयोगाकडे नेऊन दिले. आमच्या घरी रद्दी वाढली म्हणून आम्ही ते दिले नाहीत. निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर आम्ही प्रतिज्ञापत्र दिले होते. हा उपद्व्याप केल्यानंतर निवडणूक आयोग हे चालणार नाही म्हणत असेल आणि निवडणून आलेल्यांच्या संख्येनुसार पक्ष ठरेल असे सांगत असेल तर त्यांनी ते पात्र आहेत की नाही याचा निर्णय आधी व्हायला हवा. हा निकष तुम्हाला लावायचा होता तर आम्हाला आधी मेहनत करायला लावली. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे," अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.