Maharashtra Politics : शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा (Dussehra Melava), ही शिवसेनेची (Shivsena) ओळख. एक पक्ष, एक मैदान आणि एक नेता. बाळासाहेब ठाकरेंच्या भगव्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिकांची होणारी गर्दी, ही शिवसेनेची परंपरा. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ती परंपरा सुरू ठेवली. मात्र शिवसेना फुटल्यानंतर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यावरुन दोन्ही गट अक्षरश: हमरीतुमरीवर आलेत. गेल्यावर्षीचा संघर्षाचा कित्ता याहीवर्षी गिरवला जातोय. शिवसेनेचे दोन्ही गट दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर ठाम आहेत. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी महापालिकेकडे अर्ज केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाचा दावा काय? 
मागच्या वर्षीचा न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनं आहे. दीड महिन्यापूर्वी मुंबई महापालिकेला पत्र दिलंय. न्यायालयाच्या निकालाची प्रत या वर्षीच्या पत्रासोबत जोडलीय त्यामुळे यावर्षी आम्हाला शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही असा विश्वास  ठाकरे गटाला आहे. 


शिंदे गटाचा दावा काय?
महिन्याभरापूर्वीच अर्ज दिलाय. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे  त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी आम्हालाच मिळावी असा दावा शिंदे गटानं केलाय. दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन दोन्ही गट हमरीतुमरीवर आलेत. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढलाय तर गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा बाप काढलाय. 


शिंदेंच्या वडीलांनी शिवसेना स्थापन केली होती का? आमचा फुटलेला गट नाही तर त्यांचा फुटलेला गट आहे. महाराष्ट्रात, दिल्लीत तुमची सत्ता आहे, म्हणून तुम्ही काहीही कराल, हे चालणार नाही. गेल्या वर्षीसुद्धा दसरा मेळवा शिवतीर्थावर झाला आणि यावर्षीसुद्धी शिवतिर्थावरच दसरा मेळवा होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर प्रकरण न्यायालयता आहे आणि न्यायालय ज्याच्या बाजूने निर्णय देईल त्यांचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होईल गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. राजाराम राऊतने शिवसेना स्थापन केलेली नाही असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 


1966 पासून शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो.. बाळासाहेबांमुळे शिवाजी पार्कची ओळख शिवतीर्थ अशी झाली. मात्र शिवसेना फुटल्यानंतर दसरा मेळावा वादात सापडलाय. ठाकरे गटाची प्रत्येक पावलावर कोंडी करण्याचा विडाच शिंदे गटानं उचललाय. सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी कुणाला मिळणार? शिवतीर्थावर आवाज कुणाचा घुमणार? या चर्चांना उधाण आलंय.