देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : विविध प्रकारची आमिष आणि पदांची लालूच दाखवली जात असून मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा शिंदे गटाचा (Shinde Group) प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका केल्या जात आहेत, तुमचा गट मोठा करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवून काय साध्य करू इच्छिता ? असा सवाल मनसे सरचिटणीस संजय नाईक (Sanjay Naik) यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र तुमच्याकडे अपेक्षेने पहात आहे, पण तुम्ही कुठची तरी लालच देऊन, काहीतरी आमिष आमच्या पदाधिकाऱ्यांना देतायत, ते अजून स्वत: स्थिर झालेले नाहीत, अजून ते स्वत:ला ताकदवान समजत नसतील, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांना समज द्यावी, असा सल्लाही संजय नाईक यांनी दिला आहे. शिंदे गटाने आणखी शत्रू निर्माण करून त्यांच्या पायावर धोंडा मारून घेऊ नये असंही नाईक यांनी म्हटलं.


'मनसे स्वबळावर लढणार'
आगामी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) स्वबळावर सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा लढवेल असे स्पष्ट संकेत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दिले आहेत.


मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर मुंबईतील परप्रांतीय समाज - विशेषत: उत्तर भारतीय आणि गुजराती समाज मनसेकडे आकृष्ट झाला आहे. हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज सर्वांना भासत असून आगामी निवडणुकीत मराठी माणसासोबत गुजराती तसंच हिंदी भाषिक मतदारही मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान करतील अशी अपेक्षा पक्ष बाळगून आहे.


राज ठाकरे यांनी भोंग्यांचा संदर्भात लिहिलेलं पत्र मुस्लिमबहुल भागात वितरीत करण्यासाठी शाखाध्यक्ष गेले असताना त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे काही काळ कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला. मात्र स्थानिक पातळीवर हिंदू समाज एकवटला आहे. राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिका आणि करोना संकटकाळात मनसे शाखाध्यक्ष तसंच महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं सामाजिक कार्य यांमुळे स्थानिक पातळीवर मतदारांच्या मनात मनसेविषयी चांगली भावना आहे.