मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आलं. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचं वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्यानं राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका संच विकसित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नपत्रिका संचाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. 


गेल्या दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे.  रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचं स्वरूप कसं असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावं, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपत्रिका संच तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती.


या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका संच विकसित करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझं कमी व्हावं यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.


परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितलं.