रामदास आठवले `सिल्व्हर ओक`वर, सस्पेन्स वाढला
आठवलेंचं मत सगळेच गांभीर्यानं घेतात, असंही यावेळी पवारांनी म्हटलंय.
मुंबई : शुक्रवारी आरपीआय नेते रामदास आठवले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. भाजपाच्यावतीनं रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. आठवले - पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलंय. परंतु, 'अडचणीच्या काळात नेहमीप्रमाणेच सल्ला घेण्यासाठी पवारांकडे आलो असल्याचं' रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं.
राज्यात निर्माण झालेल्या पेचासंदर्भात ज्येष्ठ नेत्याकडून सल्ला घेण्यासाठी आपण पवारांची भेट घेतल्याचं यावेळी रामदास आठवले यांनी म्हटलं. परंतु, 'भाजपा आणि शिवसेना यांच्या महायुतीला जनादेश मिळालाय. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावं' असंच आपल्याला पवारांनी म्हटलं. तुम्हीच शिवसेना आणि भाजपा सरकार स्थापन करण्याचा सल्ला द्या, असं म्हटल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून सल्ला घ्यायला आठवले माझ्याकडे आले होते. परंतु, जनादेश शिवसेना-भाजपा युतीच्या पारड्यात आहे त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं... 'आठवलेंनी मत मांडलं तर ते सगळेच गांभीर्यानं घेतात' अशी पुश्तीही यावेळी शरद पवार यांनी जोडली.
महायुतीला स्पष्ट बहुमत आहे त्यांनी राज्यात स्थिरता यावी यासाठी प्रयत्न करायला हवेत, तर महायुती सरकार स्थापण्यापासून पळ काढतेय. राज्यपाल आणि राष्ट्रपती आणखी किती दिवस थांबणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
राष्ट्रवादी यात काहीही करू शकत नाही, असं म्हणत आपण अद्यापही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचं पवार यांनी दाखवून दिलंय. त्यामुळे, राज्यातील राजकीय पेचात शरद पवार काय भूमिका घेणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय.