मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (State Corona Count increased) डोकं वर केलं आहे. राज्यात 6 हजार 281 नवे कोरोना रूग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या मुंबईत 897 बाधित रुग्ण सापडले आहेत.  दिवसागणिक रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. नियमांचं पालन न केल्यास नाईट कर्फ्यूचा विचार केला जाईल असा इशारा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोनाचे 7 हजार 569 म्युटेशन्स अस्तित्त्वात असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी हे विश्लेषण केलं आहे. भारतातील कोरोना घातक नसल्याचाही दावा संशोधकांनी केला आहे. राज्यात कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  राज्यात ६ हजार २८१ नवे कोरोना रूग्ण तर कोरोनामुळं ४० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे ४८ हजार ४३९ ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.



मुंबईत तब्बल ८९७ रूग्ण सापडले तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईपाठोपाठ रुग्णवाढीत अमरावतीचा क्रमांक लागतो. त्यामुळे अमरावतीत 36 तासांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना पोलीस पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये आल्याचं दिसतंय. ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्यासह तमाम अधिकारी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.


मास्क न वापरणाऱ्या तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यांना दणका देत कारवाई करण्यात आली. 44 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसुल करण्यात आलाय. महागाई विरोधात काँग्रेसच्या मोर्चामध्ये नियम मोडणाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. दुसरीकडे डोंबिवलीमध्येही दोनपेक्षा जास्त प्रवासी बसवणाऱ्या 60 रिक्षाचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचं आवाहन पोलीस करतायत. गेल्या वर्षी पोलिसांनी दिलेले फटके अनेकांना आठवत असतील. पुन्हा तसे फटके पडायला नको असतील, तर काटेकोरपणे नियम पाळा.