मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हे गायब झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकांत ते गायब झाल्याची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीत, शुक्रवार रात्रीपासून आमदार गायब असल्याचं सांगण्यात आलं आहे. आमदारांचा लवकरात लवकर शोध घेण्याची विनंती या कुटुंबाकडून घेण्यात आली आहे. दौलत दरोडा यांच्या कुटुंबातील सदस्य पांडुरंग बरोरा यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय नाशिकच्या कळवण भागातील राष्ट्रवादीचे आमदार नितिन पवारदेखील गायब झाल्याचं बोललं जात आहे.


महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर शनिवारी सकाळी ८ वाजता भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्मथनातून शिवमहाआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच, शनिवारी संपूर्ण राजकीय खेळी पलटली. 


  


अजित पवारांच्या साथीने भाजपने शपथविधी केल्यावर आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता यावर सुनावणी करण्यात येणार आहे. नव्याने निर्माण झालेल्या भाजप सरकारला आजच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी या तीनही पक्षांच्या याचिकेत करण्यात आली आहे.