सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई  : मविआची (Mahavikas Agahdi Government) सत्ता गेली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) आलं. मात्र या दोघांमध्येच आता मतभेद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आणि या मतभेदाचं कारण आहे IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या. राज्यात अलिकडेच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या (Police Officers) बदल्यांना अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या (Election 2022) पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय हे IPS अधिकाऱ्यांच्या हातात असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आपल्या मर्जीतले अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांची दिलीय. रविवारी या दोन्ही नेत्यांचे एकत्रित तीन नियोजित कार्यक्रम होते. दोघांनी या तीनही कार्यक्रमांना उपस्थिती लावली खरी, मात्र ती एकत्र नव्हे तर वेगवेगळी, आणि त्यामुळेच मतभेदाच्या चर्चांना आणखीनच रंग चढला.  


सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शनिवारी वर्षावर बैठक झाल्याचं समजतंय. मात्र या बैठकीत पोलिसांच्या बदल्यांबाबात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमत होऊ न शकल्याचं सूत्रांचं म्हणणंय. आणि या मतभेदांमुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रविवारच्या नियोजित कार्यक्रमांना समोरासमोर न आल्याचा बोललं जातंय. 


आपल्या गटातील आमदार, खासदारांचं वजन वाढवण्यासाठी संबंधित ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमधील तक्रारींचा निपटारा जलदगतीनं होणं गरजेचं असतं. त्यामुळेच मर्जीतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकारण्यांना मोठा रस असतो. आता IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद कधी मिटणार आणि बदल्यांना कधी मुहूर्त मिळणार याची उत्सुकता आहे.