मुंबई : राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संप न करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आज सकाळी पुन्हा यासंदर्भात सुनावणी पार पडली. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार अभ्यास समिती स्थापन करणार आहे. आज दुपारी समितीचा जीआर जारी करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असलं तरी एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. राज्य सरकारकडून जोपर्यंत लिखित स्वरुपात येत नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका एसटी कामगार संघटनांनी घेतली आहे. 


एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला


महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प झालीय. एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. आज राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विविध एसटी स्थानकातली वाहतूक ठप्प आहे. बहुतांश आगारात कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी ठप्प आहे. राज्यभरातील तब्बल 220 डेपो बंद आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. असं असताना खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट देखील सुरू आहे. एस टी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. आधी कमिटीचा जीआर काढण्याची मागणी संघटनांनी लावून धरलीय. लवकर तोडगा निघाला नाही, तर 100 टक्के कामगार संपावर जातील, असा इशाराही संघटनांनी दिलाय. 


एसटी तोट्यात असल्याचं कारण


एसटी तोट्यात असल्याचं कारण देत एसटी महामंडळाने महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढ दिलेली नाही. कोरोना काळात 306 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तर आर्थिक समस्येमुळे आतापर्यंत जवळपास 31 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होतायत. पण कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचाही कोट्यवधींचा महसुल रोज बुडतोय. वेळप्रसंगी सहकुटुंब जेलमध्ये जाऊ पण मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.