मुंबईच्या मुख्य प्रवेश मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा
अतिदक्षतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मुख्य प्रवेश मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे.
मुंबई : अतिदक्षतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मुख्य प्रवेश मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. पूर्व मुंबई उपनगरातील ऐरोली आनंदनगर टोलनाका मॉडेल चेक नाका या परिसरांमध्ये पोलिसांकडून २४ तास करडी नजर आहे. मुंबई प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा देखील मुंबईच्या प्रवेशद्वारांवर तैनात करण्यात आला आहे.
परिमंडळ सातच्या पोलीस उपायुक्तांकडे या परिसरात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. यादरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईत प्रवेश करताना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय परंतु अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबईत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. विशेषत: रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मुंबई आणि देशातल्या महत्त्वाच्या शहरात हायअलर्ट जारी केला होता.जैश-ए-मोहम्मद ही अतिरेकी संघटना मोठा कट रचत असून त्यासाठी आयएसआय संघटना मदत करत असल्याचे या हायअलर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.