दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: काँग्रेस नेते राजेश राठोड यांची सोमवारी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना चांगलीच दमछाक झाली. राजेश राठोड हे जालन्याच्या उमरखेड येथील रहिवासी आहेत. शनिवारी काँग्रेसकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यावेळी राजेश राठोड हे पुण्यात होते. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरु केली. मात्र, त्यांनी कागदपत्रे ही जालन्यातील घरी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल


रविवारी ही कागदपत्रे पुण्यात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. ही कागदपत्रे मिळाल्यानंतर राजेश राठोड यांनी रात्रीचा प्रवास करून मुंबई गाठली. मात्र, लॉकडाऊनमुळे आज सकाळपासून त्यांची चांगलीच धावपळ झाली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. लॉकडाऊनमुळे राठोड यांना त्यासाठी सरकारी कार्यालयावर अवलंबून राहावे लागेल. आज सकाळी दहा वाजता सरकारी कार्यालये सुरु झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले. त्यानंतर कागदपत्रांची खातरजमा करून नोटरी करण्यात पुन्हा तास-दीड तास गेला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी तीनपर्यंतची मुदत होती. त्यामुळे राठोड दीड वाजता विधानभवनात पोहोचले. अखेर दोन वाजण्याच्या सुमारास राठोड यांनी आपला अर्ज भरला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. 


विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा


दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे विधिमंडळात आले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस हेदेखिल उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाआघाडीचे नेतेही उपस्थित होते.