प्रदेश काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य, नव्या नियुक्तीनंतर सचिन सावंत यांचा राजीनामा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये नव्या नियुक्त्या केल्या आहेत
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) नाराजी नाट्य पाहिला मिळत आहे. सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. थेट हायकमांडला पत्र लिहून सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सचिन सावंत काँग्रेसच प्रवक्ते म्हणून काम पहात आहेत.
पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करुन त्या पदावर सचिव सावंत यांना डावलून अतुल लोंढे (Atul Londhe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन सावंत नाराज असल्याचं बोललं जात असून यातूनच त्यांनी राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची आणि डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.