मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर इच्छुकांची नाराजी उफाळून आली आहे. या आमदारांची समजूत काढताना नेत्यांची पुरती दमछाक होत आहे.ठाकरे सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिपदाची आशा बाळगून असलेले अनेक नेते नाराज झालेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नाराजांचे प्रमाण जास्त आहे. माजलगावचे राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळुंके चौथी टर्म असतानाही डावलण्यात आल्याने नाराज होते. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी चालवली होती. मंगळवारी सकाळपासून धनंजय मुंडे, अजित पवार आदी नेते त्यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात होते. अखेर दुपारी प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सोळुंके यांचे समाधान झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीचे मुख्य सूत्रधार असलेले खासदार संजय राऊतही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळ विस्तारावेळी डावलण्यात आले. त्याबरोबरच कोल्हापूरचे प्रकाश आबिटकर, ठाण्यातील प्रताप सरनाईक, परभणीचे राहूल पाटील, भूम परंडाचे आमदार तानाजी सावंत, सहावी टर्म असलेले भास्कर जाधव, विदर्भातील रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हेदेखील पक्षावर नाराज आहेत. अर्थात आपली नाराजी कुणी जाहीर केली नसली तरी सामानाचा अग्रलेख आणि संजय राऊत यांचा ट्विट यातून नाराजी प्रकट झाल्याची चर्चा आहे.


बच्चू कडू, शंकरराव गडाख, राजेंद्र येड्रावकर ही 'अपक्ष' मंडळी शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाल्यामुळे मुळच्या शिवसैनिकांची संधी हुकली आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांना बहुदा त्यामुळेच संधी मिळाली नाही. बाकी शिवसेनेचे चेहरे तेच आहेत, असे लिहून राऊत यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.


तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची फेसबुक पोस्टही पुरेशी बोलकी आहे. मंत्रिपद मिळाले नसले तरी लाथ मारू तिथे पाणी काढू. मला मंत्रिपद मिळाले नसले तरी मी नाराज नाही. काही कार्यकार्ते नाराज असले तरी नाराजी बाजूला ठेऊन काम करायचे आहे. मी आमदार जरी असलो तरी मला काही अडचण येणार नाही, असे रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.