महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वर्षपूर्ती केली आहे.
मुंबई : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वर्षपूर्ती केली आहे. कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी दिली.
सरकार किती वर्ष चालणार? शरद पवार म्हणाले...
सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.
जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आले. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठिशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार हे शासन काम करीत असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच वर्षभरात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचे प्रतिबिंब या पुस्तिकेत उमटले असून पुस्तिकेच्या उत्तम निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.