मुंबई : मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची घटना महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे, असा घणाघात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केला आहे. पुतळा कोसळून महाराजांचा घोर अपमान करणाऱ्या युती सरकार विरोधात रविवारी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत 'जोडे मारो' आंदोलन करणार असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जाणार आहे. तर 2 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात जिल्हा आणि तालुक्यातही हे आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद (Sharad Pawar) पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची हिम्मत या भाजपा युतीच्या नेत्यांची होतेच कशी? भ्रष्टाचाराचा कलंक लागलेल्या एका खासदाराने महाराजांचा जिरे टोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवून महाराजांचा अपमान केला. आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात यापेक्षा मोठा पुतळा बसवू, या कमीशनखोर सरकारला अक्कल कधी येणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आज महिला, शाळेतील मुलीही सुरक्षित नाहीत, जनतेत सरकार विरोधात प्रचंड आक्रोश आहे. घाबरलेले सरकार जनतेचा उठाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.


राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. रश्मी शुक्ला यांना कोणत्या आधारावर पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाळ वाढवून दिला आहे. या पोलीस महासंचालक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचा अजेंडा चालवत आहेत. राज्य सरकारची चुकीची धोरणे व पोलीस प्रशासनाच्या कारभारामुळेच राज्यातील परिस्थिती बिघडली आहे, असेही नाना पटोले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून अपमान करण्यात आला. या घटनेवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने बनवलेला व्हिडीओ यावेळी  काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना दाखवला.


जयदीप आपटे फरार
शिवरायाच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटील यांच्याप्रमाणेच जयदीप आपटे घराला टाळे लावून फरार झालाय. मालवण पोलिस स्थानकात  आर्टिस्टरी कंपनीचे मालक असलेले शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटन्ट चेतन पाटलाविरोधात सदोष मनुष्यवध, शासनाची फसवणूक यासह गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.