महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटले, मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी नवा प्रस्ताव
मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी सरकारचा दुसरा प्रस्ताव
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवायला परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला आहे. हा प्रस्ताव देण्यासाठी महाविकासआघाडीचे बडे नेते राजभवनावर गेले होते.
'९ एप्रिलला पाठवलेल्या प्रस्तावाबाबत आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नव्हती. काल पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन राज्यपालांना स्मरण पत्र पाठवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे. राज्याच्या मंत्री मंडळाने दुसऱ्यांदा ठराव करून जो प्रस्ताव दिला आहे, त्यावर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती राज्यपालांना केली. राज्यपालांनी यावर विचार करतो, असं सांगितलं', असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
'आम्ही आता कोणतही राजकिय भाष्य करणार नाही. या संदर्भात लवकरच राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. सध्या आम्ही सगळे, मुख्यमंत्री आणि सर्व यंत्रणा कोरोनाच्या विरोधात लढण्यात गुंतले आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांचा कालावधी पुर्ण होण्याआधी हा प्रस्ताव मंजूर करतील अशी आम्हाल अपेक्षा आहे', असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
उद्धव ठाकरेंना आमदार करण्यासाठीच्या प्रस्तावाचं नवीन पत्र महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलं. अजित पवार, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, अनिल परब, अस्लम शेख आणि बाळासाहेब थोरात हे नेते नवा प्रस्ताव देण्यासाठी राजभवनावर गेले होते.